BMC "H" West Division| जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे, काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद
शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत
पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी:-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुनी, जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी निष्कासित करण्यात येणार आहे. तसेच, वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेल्या ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून रात्री १२ वाजेदरम्यान केली जाणार आहेत. या कामांमुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत जीर्ण जलवाहिनी निष्कासित करणे, नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारणार आहे. एकंदरीतच एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे.
दुरूस्ती कामामुळे खालील परिसरांना शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
पेरी परिक्षेत्र- वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १० ते दुपारी २) पाणीपुरवठा बंद राहील.
खार दांडा परिक्षेत्र- खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ०५.३० ते रात्री ०८.३०) पाणीपुरवठा बंद राहील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री ०९.०० ते रात्री १२.००) पाणीपुरवठा बंद राहील.
संबधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. जलवाहिनी दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
WhatsApp Group Join Now
0 Comments