मुंबई प्रतिनिधी:-
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस. हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची स्मृती चिरंतन रहावी, म्हणून या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर केले जातात. त्यानिमित्ताने आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२३-२४ च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव यांनी आज (दिनांक ०५ सप्टेंबर २०२४) महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात निर्धारित निकषांनुसार संबंधित समितीद्वारे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून सुरू आहे. या परंपरेत आता दरवर्षी ५० आदर्श शिक्षकांना ‘महापौर पुरस्काराने’ गौरविण्यात येते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे), बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे.
सन- २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १५८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारार्थींमध्ये २६ महिला शिक्षकांसह २४ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच पुरस्कारार्थींमध्ये मराठी माध्यमाचे १०, इंग्रजी माध्यमाचे ५, तसेच हिंदी आणि उर्दू माध्यमाचे प्रत्येकी ६, गुजराथी भाषा एक, दाक्षिणात्य भाषा एक, विशेष शिक्षक ४, विशेष मुलांची शाळेतील एक शिक्षक, महानगरपालिका माध्यमिक शाळा ४, मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १२ असे एकूण ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
WhatsApp Group Join Now
0 Comments