Header Ads Widget

Responsive Advertisement

District Election Officer Bhushan Gagrani reviewed the preparations in Mumbai in the background of 2024 assembly elections

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दोन हजार चौवीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी घेतला आढावा


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सह पोलिस आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकाऱयांची उपस्थिती

 


          आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आज (दिनांक १३ सप्टेंबर २०२४) आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही श्री. गगराणी यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले.

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी ( मुंबई शहर), श्री. संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) श्री. राजेंद्र क्षीरसागर, सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदान संयंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी, पोलिस आणि निवडणूक यंत्रणा यांच्याकडून विविध मतदारसंघांमध्ये संयुक्त पाहणी आदींबाबत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (उपनगरे) श्री. राजेंद्र क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार यांनी आढावा सादर केला.

संपूर्ण स्थिती जाणून घेत प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीशी संबंधीत मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, हे सुनिश्चित करावे. मतदार यादीमध्ये मतदारांची नाव नोंदणी करणे इत्यादी प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी. नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून अगदी जवळ मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभ रचनेवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देखील गृहनिर्माण संस्थांशी पुन्हा एकदा भेटी देऊन समन्वय साधावा. संपूर्ण कामकाजादरम्यान कोणत्याही प्रकारची लहानात लहान अडचण असेल तरी ती आपल्याकडे न ठेवता त्यावर वेळीच आणि योग्य पद्धतीने तोडगा निघावा, यासाठी वरिष्ठांशी वेळोवेळी चर्चा करावी. निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देशही श्री. गगराणी यांनी यावेळी दिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments