आणीबाणी स्मृतीदिनी समाजवादी कामगार संघटनांचा लढण्याचा निर्धार,जॉर्ज फर्नांडिस यांच्या संघर्षाच्या जागवल्या आठवणी
शरद पवार यांच्या हस्ते जॉर्ज यांच्या लढाऊ सहकाऱ्यांचा गौरव
मुंबई (प्रतिनिधी) :
जॉर्ज फर्नांडिस यांचं खऱ्या अर्थाने स्मरण करायचं असेल तर, काय वाटेल ती किंमत देऊ. पण हा देश संसदीय लोकशाहीवादी देश म्हणून अखंड राहील. त्यासाठी जे करावं लागेल, ते करण्याची तयारी आम्हा सगळ्यांची राहील. या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पावर यांनी काल अघोषित आणीबाणीवर हल्ला चढवला.
मुंबई लेबर युनियनच्या पुढाकाराने आणीबाणीच्या पन्नासीबद्दल मुंबईतील समाजवादी कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा के. सी. कॉलेज येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हा शरद पवार बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हिंद मजदूर किसान पंचायतचे राज्य अध्यक्ष आणि समाजवादी नेते कपिल पाटील होते. मुंबई लेबर युनियनचे जनरल सेक्रेटरी संजीव पुजारी या मेळाव्याचे निमंत्रक होते.
आणीबाणी इंदिरा गांधींनी लावली होती. मात्र पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली. ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली. आणि चित्र बदललं होतं असंही शरद पवार यांनी आवर्जून नमूद केलं.
समाजवादी नेते कपिल पाटील यांनी यावेळी सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण, कष्टकरी कामागारांच्या अन्य प्रश्नांवरून जोरदार प्रहार केला.
जॉर्ज यांना मानणाऱ्या समाजवादी संघटना पुन्हा एक झाल्या आहेत. बेस्ट आणि सफाई कामगारांच्या कंत्राटीकरणाने खाजगीकरणाला सुरवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचं खाजगीकरण रोखण्यासाठी त्या सर्व संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशाराही कपिल पाटील यांनी दिला.
मराठीचा कैवार घेणारे पक्ष सत्तेवर असताना कष्टकरी मराठी माणूस मुंबईतून बदलापूरला हाकलला गेला. सरकार कंत्राटीकरण करून कामगार, कष्टकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. त्याविरोधात उभे रहावे लागेल. जॉर्ज फर्नांडिस म्हणजे संघर्ष. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लढण्याचा निर्धार करुया, असंही कपिल पाटील यांनी म्हटलं.
आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले आणि बडोदा डायनामाईट केसमधील जॉर्ज यांच्या सहकाऱ्यांचा यावेळी जॉर्ज फर्नांडिस जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते सुभाष मळगी, पद्मनाभ शेट्टी, विजय नारायण सिंह, मोतीलाल कनोजिया, देवी गुजर, शंकर साळवी, शंकर शेट्टी, फेड्रिक डिसा, संजीव पुजारी, सुरेश ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला गेला.
या मेळाव्यात राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे नेते विश्वास काटकर, माजी खासदार अनिल हेगडे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अशोक जाधव, वामन काविस्कर, दी म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने, बेस्ट कर्मचाऱ्यांचे नेते रंगनाथ सातवसे, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते हनुमंत ताटे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, जॉर्ज यांचे सहकारी अभिषेक रंजन, क्रांती प्रकाश, एस. एस. मेहरा, शब्बीर अहमद विद्रोही, घरकामगारांच्या नेत्या मधू बिरमोळे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते शिवाजी खांडेकर, एचएमकेपीचे पी. व्ही. फडतरे, प्रफुल्ल म्हात्रे, बीएमसी कर्मचारी नेते रमेश भुतेकर, आरएमयूचे राजेंद्र सिंह यांच्यासह अनेक कामगार नेते, कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सूत्रसंचालन केले.

0 Comments