शेतकरी, ग्रामीण व औद्योगिक प्रश्नांवर आक्रमक भाष्य — आमदार सिद्धार्थ खरात यांचा विधानसभेत सत्ताधाऱ्यांना जोरदार हिसका
मुंबई दि १७:-
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण भागाचा अक्षम्य विकास, आणि औद्योगिक व पर्यटन क्षेत्रातील दुर्लक्ष या मुद्द्यांवर शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 293 क्रमांकाच्या प्रस्तावावर भाषण करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आणि सरकारच्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश केला.
*शेतकरी आत्महत्या आणि हमीभावाचा मुद्दा*
आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून केली. सरकारने दिलेले हमीभाव, कर्जमाफी आणि उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासने पूर्णपणे फोल ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
"शेतकऱ्यांना काय मिळालं? ना हमीभाव, ना कर्जमाफी, ना उत्पन्नात वाढ... तरीही मंत्र्यांच्या तोंडून विकासाच्या गप्पा चालू आहेत!" असा सणसणीत सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "जानेवारी ते जून 2025 या कालावधीत तब्बल 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जर सरकारमुळे आनंद वाढला असता, तर हे शेतकरी आत्महत्या का करत आहेत?"
*औद्योगिक मागासलेपण आणि एमआयडीसीचा प्रश्न*
औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावरही आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारला धारेवर धरले.
"महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 9 जिल्हे खऱ्या अर्थाने विकसित आहेत. उरलेले 27 जिल्हे अजूनही मागास असून, त्यापैकी 12 जिल्हे अतीमागास आहेत, याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे."
मेहकरमध्ये 1989 मध्ये सुरू झालेली एमआयडीसी अतिक्रमणात गेली, आणि आजही त्या भागात एकही मोठा उद्योग नाही, असे ते म्हणाले. नवीन उद्योग स्थापनेसाठी 300 एकर अतिरिक्त जागेची मागणी त्यांनी सभागृहात केली.
"आम्हाला शेतीवर आधारित उद्योग हवेत. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि सुविधा देणे सरकारचे कर्तव्य आहे."
*लोणार सरोवर पर्यटनाची दुरवस्था*
आ.खरात यांनी लोणारच्या पर्यटन विकासावरही भाष्य करत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
"५२,००० वर्षांपूर्वी उल्कापात झालेलं जागतिक महत्त्वाचं लोणार सरोवर हे आज बकाल अवस्थेत आहे."
वनविभाग, पर्यटन आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वय अभावामुळे लोणारचा विकास अडकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"लोणावळ्यासारखं लोणार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी मी लोकांना वचन दिलं होतं. पण या ठिकाणी स्थापन केलेल्या समितीत लोकप्रतिनिधीच नाहीत! हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणं आहे."असा आरोप त्यांनी केला.
भाषणाच्या शेवटी त्यांनी सरकारवर भाषणबाजीचा आरोप करत अत्यंत मार्मिक शब्दात विचार मांडला .
"कोऱ्या कागदावर शाईनं काळं करणं सोपं आहे, पण मातीला हिरवं करणं कठीण आहे. जर भाषणांनी शेतकरी सुखी होत असेल, तर आज आत्महत्या करण्याची वेळच आली नसती!"असेही ते बोलले.

0 Comments