येत्या आठ व नऊ जुलै रोजी अंशतः अनुदानित शिक्षकांचे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन
संचालकाचे शिक्षणाधिकाऱ्यांना शाळा बंद होऊ नये यासाठी दक्षता घेण्याची निर्देश दिल्यानंतरही समन्वय संघ शाळा बंद आंदोलनावर ठाम
शासनाने शिक्षणाधिकाऱ्याला निर्देश देण्यापेक्षा 25 वर्ष विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना मंजूर हक्काचा पगार द्यावा. संजय डावरे
मुंबई प्रतिनिधी:-
राज्यातील तमाम अंशतः अनुदानित शाळांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार लागणाऱ्या निधीची तरतूद न केल्याने राज्यातील सर्व शाळा येत्या आठ व नऊ जुलै रोजी बंद राहणार आहेत अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक संजय डावरे यांनी दिली.
राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणी करता ऑगस्ट २०२४ पासून कोल्हापूर येथे ७५ दिवस तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू होती.याची परिणीती म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी १०ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयात या सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे शासनाने कबूल केले.तशा शासन निर्णय देखील १४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आला.मात्र यानंतर दोन अधिवेशने झाली आणि सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन हे तिसरे अधिवेशन आहे परंतु या शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद काल विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत नाही.यामुळे राज्यातील साठ हजार हून जास्त विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा म्हणून ५ जून २०२५ पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे.या प्रश्नासंदर्भात वेळोवेळी संबंधित मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या त्यावेळी तुमचे काम आम्ही करणार आहोत,होणार आहे असा शब्द दिला गेला.परंतु प्रत्यक्षात आमच्या तोंडाला पाणी पुसली असल्याचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
एकीकडे लाडक्या बहिणींना कोणतीही मागणी न करता हजारो कोटींचा निधी दिला जात आहे मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून विनावेतन पवित्र असे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना शासन झुलवत ठेवून त्यांचा अंत पाहत आहे असे समन्वयक संजय डावरे यांनी मत मांडले.
याचा निषेध म्हणून ८ व ९ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद करून हजारो शिक्षक आझाद मैदान गाठणार आहेत.या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ,महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ आणि राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात मुंबई शिक्षण उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये कडकडीत बंद राहणार आहेत. निवेदन देताना शिक्षक समन्वय संघाचे संजय डावरे उषा सिंह अनिल सिंग धनाजी साळुंखे उमेश तिवारी सुशीला तिवारी जेडी यादव सुनिता बेडसे हरिचंद्र सिंह संजीव यादव पवन सिंग संगीता सिंह , विजय सिंग चौरसिया सर दिलशाद बानो फातिमा अन्सारी स्वाती गायकवाड रितू मॅडम नोमन, निलेश पवार यांची उपस्थिती होती.
१४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार जवळपास साठ हजार विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना १ जून २०२४ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा देय आहे.

0 Comments