Header Ads Widget

Responsive Advertisement

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना महाराष्ट्र सरकारची अनोखी आदरांजली

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना महाराष्ट्र सरकारची अनोखी आदरांजली


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोड जवळ पंडित दिनदयाळ उपाध्याय चौकाचे उद्घाटन


कबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेची पूर्तता



मुंबई, 11 फेब्रुवारी : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पंडित दिनदयाळ उपाध्याय चौकाचे' उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील टाटा गार्डन नजिक, भुलाबाई देसाई रोडवर, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाजवळ हा चौक उभारण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिका व लोढा फाउंडेशनच्या सहकार्याने हा चौक साकारण्यात आला.  

या प्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, लोढा फाउंडेशनच्यावतीने मंजू लोढा, दिनदयाळ शोध संस्थेचे सचिव अतुल जैन, पंडितजींचे नातू विनोद शुक्ल, विविध देशांचे कौन्सिलेटस आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या चौकात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे रेखीव शिल्प उभारण्यात आले असून, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची माहिती देण्यात आली आहे.  

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि लोढा फाउंडेशनच्या मंजू लोढा यांचे या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला आकार देण्याचे कार्य पं दिनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी केले. शतकानुशतके आपली संस्कृती टिकून राहिली, कारण तिच्यात एक शाश्वतता आहे आणि हीच शाश्वतता एकात्म मानव दर्शनाच्या मुळाशी आहे. भारतीय विचारांनी प्रेरित प्रशासन व्यवस्था हे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा गाभा आहे. हाच गाभा 'विकास आणि विरासत' तसेच 'सबका साथ, सबका विकास' या ध्येयांचा पाया आहे. अंत्योदयाच्या विचारांमुळेच आज २५ कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेच्यावर आणणे शक्य झाले. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. प्रत्यक्ष दिनदयाळजींच्या विचारांवर काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारताकडे भारताला नेत आहेत."  

"या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून आणि अंत्योदयाच्या संकल्पातून शेवटच्या व्यक्तीच्या विकासाचा व शाश्वत प्रगतीचा मार्ग पं दिनदयाळ उपाध्याय यांनी दाखवला. याच विचारांच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्राचा विकास साधत आहेत. केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या योजनांमध्ये पंडितजींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना, सौर ऊर्जेची उपलब्धता, मजुरांची सुरक्षा आणि सन्मान या योजनांच्या माध्यमांतून अंत्योदयाचा विचार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पुढे नेत आहेत. या प्रवासात आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि महाराष्ट्र सरकारसोबत कार्य करूया." असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.  

"मुंबईसारख्या महानगरात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे विचार तेवत ठेवण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो. नानाजी देशमुख यांनी १९७२ मध्ये दिनदयाळ संशोधन संस्थेची (DRI) स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील गोंडा व चित्रकूट येथे तसेच महाराष्ट्रातील बीड येथे एकात्म मानव दर्शन या विचाराची अनुभूती आपण घेऊ शकता. कृपया या ठिकाणांना आपण भेट द्यावी आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे विचार आत्मसात करावेत," असे दिनदयाळ शोध संस्थेचे सचिव अतुल जैन यांनी सांगितले.  

एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदयाचे प्रणेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे तत्त्वज्ञान आत्मसात करून समाजातील शेवटच्या माणसाच्या उत्थानावर भर देणारी धोरणे महाराष्ट्र सरकार राबवत आहे. त्याचप्रमाणे केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या योजनांमध्ये पंडितजींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या चौकाचे उद्घाटन ही त्यांना अर्पण केलेली एक अनोखी आदरांजली ठरली.

Post a Comment

0 Comments